कर्जाचे वाटप झाले तरच बँका चालतील: विद्याधर अनास्कर

उद्योग- व्यवसाय कर्ज कार्यशाळेस नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे: कर्ज देताना बॅंका संबंधितांची आर्थिक शिस्त पाहतात. चांगले कर्जदार आहात अशी खात्री पटली की कोणतीही बॅंक कर्ज देण्यास नकार देणार नाही. बॅंकांनी कर्ज वाटली नाहीत तर बॅंका चालणार नाहीत, अशी मार्गदर्शनपर माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.

जागतिक सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक (एमएसएमई) दिनानिमित्त, सुप्रसिद्ध सोमेश्वर फाउंडेशन, दे आसरा फाउंडेशन आणि मराठा एंत्रप्रेन्योर असोसिएशन ( मराठा उद्योजक संघटना) यांच्या संयुक्त विद्यमाने व्यावसायिकांसाठी उद्योग- व्यवसाय कर्ज कार्यशाळेचे आयोजन रविवार (ता.२५) जून रोजी, पंडित भीमसेन जोशी नाट्यगृहात औंध येथे करण्यात आले होते, यावेळी अनास्कर बोलत होते. मंचावर आयोजक माजी नगरसेवक सनी निम्हण, निधीतज्ज्ञ सुधीर गिजरे, मराठा एंत्रप्रेन्योर असोसिएशनचे अध्यक्ष अरून निम्हण आदी उपस्थित होते.

अनास्कर पुढे बोलताना म्हणाले, “सर्वांनी आपले व्यवहार रोखीने न करता, बॅंकेच्या माध्यमातून करावे. दररोजच्या जीवनातील आपले वर्तन कसे आहे? समाजातील प्रतिष्ठा देखील महत्वाची असते. प्रत्येक व्यावसायिकाला कर्ज मिळू शकते, मात्र प्रत्येकाने आर्थिक गोष्टीत चोख असले पाहिजे.
शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याची माहिती घेऊन नागरिकांनी कर्जासाठी व्यवस्थित फाईल तयार करायला हवी.”

व्यावसायिकांनी कर्ज मिळवणे हा त्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे. आयोजन माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी स्वागत प्रास्ताविक करताना म्हणाले, “ही कार्यशाळा उद्योग – व्यावसायिकांना उभारी देण्याची सुरवात आहे. जोपर्यंत लहान मोठ्या उद्योजकांचे समाधान होत नाही, तोपर्यंत हे काम सुरूच राहील” अशी ग्वाही निम्हण यांनी दिली.

निधी अभ्यासक प्रकाश आगाशे यांनी कर्ज घेण्यासाठी काय करावे लागते याविषयी माहिती दिली. उपस्थित व्यावसायिक व नागरिकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे अनास्कर व गिजरे यांनी दिली. यावेळी दे आसरा फाउंडेशनच्या वैशाली अपराजित, विद्या सहकारी बॅंकेच्या व्यवस्थापक लता घारे, विश्वेश्वर सहकारी बॅंकचे व्यवस्थापक मंगेश नानजकर, मराठा एंत्रप्रेन्योर असोसिएशनचे सिद्धाराम साठे, सोमेश्वर फाउंडेशनच्या मधुरा वाळंज आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत संजय माझिरे, प्रमोद कांबळे,अनिकेत कपोते, तुषार भिसे यांनी केले. उमेश वाघ यांनी सुत्रसंचलन केले तर आभार. अमित मुरकुटे यांनी मानले.

निधीतज्ज्ञ सुधीर गिजरे म्हणाले, “प्रत्येक व्यावसायाचे बॅंकेत खाते हवे. कर्ज देताना कोणतीही बॅंक दहा बारा – प्रश्न विचारते. त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आपल्याकडे हवीत.”

कर्जासंबंधी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. बॅंकेत सादर करण्यासाठी लागणारा प्रकल्प रिपोर्ट चांगला तयार करावा. सुशिक्षित तरुण उद्योजक निर्माण व्हावेत अशी आमची भावना आहे.

कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी दिलेली माहिती अतिशय महत्वाची ठरली. आर्थिक शिस्त, व्यक्तीमत्व कसे असावे, व्यावसाय करताना कोणकोणती कागदपत्रे असावीत, शासकीय योजना, अर्थकारणासारख्या किचकट गोष्टीचे भरपूर ज्ञान मिळाले यासह नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देखील यामधून मिळाली.