नवाब मलिकांना न्यायालयाचा दणका; 7 मार्चपर्यंत ईडी कस्टडी

मुंबई – महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने त्याला ७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. नवाब मलिक यांना ईडीने गेल्या आठवड्यात अटक केली असून ते कोठडीत आहेत.

ईडीच्या मागणीनंतर विशेष पीएमएलए न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत वाढ केली आहे. २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान, प्रकृती अस्वास्थेच्या कारणामुळे नवाब मलिक यांना दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तीन दिवसांमध्ये नवाब मलिक यांची चौकशी होऊ शकली नाही. तसेच तपासातून समोर आलेल्या माहितीमुळे मलिकांना ताब्यात घेऊन चौकशी होणे अधिक गरजेचे आहे असे ईडीतर्फे सांगण्यात आले. या मुद्द्यावरुन न्यायालयाने सात मार्चपर्यंत नवाब मलिकांच्या ईडी कोठडीत वाढ केली आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला नवाब मलिक यांच्यावरून अधिवशनातही मोठा राडा झाल्याचे दिसून आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्यावरून सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, एखादा मंत्री जेलमध्ये आहे. तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, अशाप्रकारची भयानक परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली आहे. मंत्र्यांवरील आरोप साधासुधा नाही. रिमांड आर्डरमध्ये ही केस कशी आहे, हे लिहिलं गेलं आहे.

मुंबई बाँब स्फोटाच्या आरोपींकडून कवडीमोल भावात जमीन विकत घ्यायची. ती जमीन तिसऱ्याच व्यक्तीची जमीन मालकाला एक पैसा द्यायचा नाही. त्या जमिनीचा कब्जा मिळवून दिल्याबद्दल दाऊदची बहीण हसिना पारकर हिला पंचावन्न लाख रुपये द्यायचे. हे पैसे कुठे वापरले गेले, असा सवाल करत मुंबई बाँबस्फोटाकरिता हा पैसा वापरला गेला असल्याचा घणाघात विधानसभेचे फडणवीस यांनी केला.