2019 च्या निवडणूका राजसाहेबांच्या सभांचा आधार घेऊन लढवणाऱ्यांनी…; खैरेंनी जगतापांना झापलं

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला आहे. भाजप नेत्यांनी मनसेच्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर मनसेने हा मोठा निर्णय घेतला आहे. या पाठींब्यामुळे भाजपला आपला विजय सुकर होईल अशी आशा आहे.

दरम्यान, कसबा मतदारसंघात मनसेची चांगली ताकत आहे. राज ठाकरे यांना मानणारा आणि हिदुत्वाच्या मुद्द्यावरून मतदान करणारा एक मोठा वर्ग आहे. या वर्गाची मते आता भाजपला मिळणार असल्याने महाविकास आघाडीचे नेते टेन्शनमध्ये आले आहेत. यातूनच आता राज ठाकरे यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे.

पुणे शहरातील राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप ( NCP leader Prashant Jagtap )यांनी मनसेवर याच मुद्द्यावरून टीका केली. ते म्हणाले, कोथरूड मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देताय…बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत. असं म्हणत जगताप यांनी मनसेवर टीका केली आहे.

दरम्यान, जगताप यांच्या या टीकेला मनसेचे नेते योगेश खैरे (MNS leader Yogesh Khaire) यांनी जशासतसे उत्तर दिले आहे. 2019 च्या निवडणूका मा.राजसाहेबांच्या सभांचा आधार घेऊन लढवणाऱ्यांनी…. पंढरपूर पोटनिवडणूकीसाठी मनसेचा पाठिंबा मागणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ! असं म्हणत जगताप यांना खडेबोल सुनावले आहेत.