धनंजय मुंडे यांना धक्का; राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा BRS मध्ये प्रवेश

बीड – आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादीत झालेल्या बंडाने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राज्याच्या राजकारणात नेमके काय सुरु आहे आणि पुढे काय होणार याचा अंदाज भल्याभल्यांना लावता येत नसल्याचे चित्र आहे. यातच आता मराठवाड्यात काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट भारत राष्ट्र समिती पक्षात (BRS) प्रवेश केला आहे. धनंजय मुंडे यांना हा मोठा धक्का मानला जातोय.

बीआरएसचे खासदार बी.बी पाटील यांच्यासह राज्यातील प्रमूख नेत्यांच्या उपस्थितीत बीडच्या गेवराई येथे हा प्रवेश सोहळा झाला. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकवर्तीय बाळासाहेब मस्के यांच्यासह मयुरी खेडकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.

राज्यातील अभद्र युती आणि आघाडीला कंटाळून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश घेतल्याचं या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रवेशाने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात भारत राष्ट्र समितीची घोड दौड सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.