पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र आणि कुंकू न लावणाऱ्या भगिनी धीरेंद्रच्या मते रिकामे प्लॉट…; जितेंद्र आव्हाड संतापले

बागेश्वरचे बाबा (Bageshwar Baba) पंडित धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एखादी महिला विवाहित आहे, हे ओळखण्याची दोन लक्षणे असतात. पहिला- भांगेतील सिंदूर, दुसरे- गळ्यातले मंगळसूत्र. जर महिलेच्या भांगेत सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र नसेल, तर समजावे की प्लॉट रिकामा आहे, असे वक्तव्य पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे.

ज्या स्त्रिच्या डोक्यात सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र आहे, तिची रजिस्ट्री झाल्याचे दुरूनच ओळखायला येते, असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत. ग्रेटर नोएडा येथील कथेदरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी या गोष्टी सांगितल्या. त्यांनी स्त्रीबद्दल केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी स्त्रियांबद्दल असे वक्तव्य केल्याने धीरेंद्र शास्त्रींवर टीका केली आहे. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी धीरेंद्र शास्त्रींवर निशाणा साधला आहे.

तो धीरेंद्र शास्त्री नावाचा बाबा म्हणतो “स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर नसेल तर समजावं की हा ‘प्लॉट’ अजून रिकामा आहे.” असलं घृणास्पद बोलणाऱ्यांची लोक भक्ती करतात? पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र आणि कुंकू न लावणाऱ्या असंख्य दुर्दैवी भगिनी आपल्या समाजात आहेत. धीरेंद्रच्या मते ते “रिकामे प्लॉट” असावे, असे ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी बागेश्वर बाबावर टीका केली आहे.