आषाढी वारी निमित्त विविध मार्गांवर जिज्ञासा आयोजित आरोग्य सेवा शिबिर

पुणे: आषाढी वारी (Ashadi Wari) ही महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा मानबिंदू आहे. या वारीत येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचे काम जिज्ञासा चे विद्यार्थी मागील ७ वर्षांपासून करत आली आहेत. या वर्षी च्या वारीसाठी ठिकठिकाणाहून दिंडींने पंढरपूर साठी प्रस्थान केले आहे. याही वर्षी जिज्ञासा चे विद्यार्थी वारीत सेवाकार्य करतील. याच विषयात आज दि. १० जून ला पत्रकार परिषद घेण्यात आली.

अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे जिज्ञासा संयोजक यावेळी बोलले की, AYUSH (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी) च्या पारंपरिक चिकित्सा पद्धतींचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी मित्रांना गुणवत्तापूर्ण आणि सर्वांना परवडेल अशा प्रकारचे उत्तम वैद्यकीय शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी अभाविप चा जिज्ञासा हा आयाम संपूर्ण भारतात कार्यरत आहे.

या वारीचे वारी प्रमुख श्रीपाल राज पुरोहित बोलले की, प्रत्येकाला समाजाप्रति संवेदना, सामाजिक जाणीव ही असतेच परंतु आपल्यासारखा वैद्यकीय पेशा असताना आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्व सामान्यांपर्यंत पोहोचावा, डॉक्टर हा समाजासाठी असतो, हे वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच मनामध्ये रुजावे आणि या करीता विविध वैद्यकीय शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी आणि डॉक्टरांना कृतीशील करावे या हेतूने जिज्ञासा द्वारे हे आरोग्य व सेवा शिबिर चालू करण्यात आले. एका पत्र्याच्या शेड मध्ये १५ जणांच्या उपस्थितीत सुरू झालेला हा उपक्रम आता पुण्यात तीन जागी , सासवड , बारामती , फलटण , इंदापुर, वाखरी अशा ठिकाणांपर्यंत विस्तारला आणि यातील वैद्य व विद्यार्थ्यांची उपस्थिती ही १० -१५ पासून सुरू होऊन ५०, १००, २५० असा करता करता मागच्या वर्षी (२०२२) ६५० हून अधिक डॉक्टरांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे तसेच काही बाहेर राज्यातील विद्यार्थी ही या उपक्रमात सहभागी होतात.

कोरोनाच्या जवळपास दोन वर्षांच्या संकटानंतर, कमी झालेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मागच्या वर्षी आषाढी वारी भव्य स्वरूपात संपन्न झाली. त्याच पार्श्वभूमी वर जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रांताद्वारे परत एकदा आषाढी वारी वैद्यकिय सेवा उपक्रम राबविण्यात आले.

या आषाढी वारी सेवा उपक्रमा अंतर्गत आळंदी, पुणे येथे ३ तसेच सासवड, बारामती, लोणंद, फलटण , इंदापूर, माळशिरस, वाखरी या ठिकाणी भव्य अशा स्वरूपाचे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर राबविण्यात आले. या वैद्यकीय सेवा शिबिरांचे वैशिष्ट्य असे की या मध्ये वापरण्यात येणारी चिकित्सा प्रणाली व औषधे ही प्रामुख्याने आयुर्वेद व होमिओपॅथी या शास्त्रांचे वापरण्यात आले. त्यामध्ये अग्निकर्म, विद्धकर्म या चिकित्सा पद्धतींचे विशेष शिबिर देखील पार पडले.

चिकित्सेबरोबरच समाजात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता, व्यसनाधीनता, अवयवदान याकरिता समाजात जागृती व्हावी यासाठी सामान्य ग्रामीण जणांना समजेल अशा ग्रामीण भाषेत पथनाट्ये उत्कृष्टपणे सादर केली गेली. महिलांमध्ये अधिक प्रमाण असलेल्या ऍनिमिया सारख्या व्याधी बद्दल प्राथमिक माहिती, कारणे, आहारिय पदार्थ काय घ्यावेत, काय काळजी घ्यावी या संबंधी पत्रके वाटण्यात आले, तसेच राहुट्यात जाऊन सर्वांना त्याचे महत्व सांगितले गेले.

या आषाढी वारी वैद्यकीय सेवा शिबीर अंतर्गत एकूण ६०००० वारकऱ्यांना सेवा देण्यात आली व एकूण डॉक्टर्स व विद्यार्थ्यांची संख्या ही ६५० इतकी होती.

अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यावेळी बोलले की, शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे, विद्यार्थी जीवन आनंदमय होण्यासाठी अनेक उपक्रम राबवणे, याच सोबत सर्व विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती सेवाभाव निर्माण करण्यासाठी देखील अभाविप आपल्या विविध आयामांमार्फत विविध उपक्रम राबवते. जिज्ञासा ही त्यातीलच एक आहे. वारीत करण्यात येणाऱ्या या आरोग्य व सेवा शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे मी त्यांना आवाहन करतो.