सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे करणार बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

ठाणे : गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील सत्तासंघर्षात ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे लावून धरणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या (ठाकरे गट) सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी शिंदे गटाकडून एक नवा डाव टाकण्यात आला आहे. सुषमा अंधारे (Susham Andhare) यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे अडसरकर हे रविवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. टेंभी नाका येथील आनंद मठात त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

टीव्ही9 मराठीशी बोलताना वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचं कारणही स्पष्ट केलं. आजचा आनंदाचा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. त्यामुळे मी त्यांच्या प्रेमात पडलो.

त्यामुळेच मी शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. रामदास कदम, गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रवेश होत असल्याचं वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं.

सुषमा अंधारे यांच्यासोबत कोणतेही मतभेद नाहीत. ही विचाराची लढाई आहे. त्यांना ते विचार आवडले त्या तिकडे गेल्या. मला एकनाथ भाईंचे विचार आवडले. एकनाथ शिंदे यांचा विद्रोही. क्रांतिकारक स्वभाव आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडे आलो आहे. ही विचाराची लढाई आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.