‘राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या परंपरेला विरोधी पक्षाने या परंपरेला तिलांजली दिली’

मुंबई – राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे पण विरोधी पक्षाने या परंपरेला तिलांजली दिली आहे. राज्यसभेसाठी खुले मतदान होत असते, महाविकास आघाडीकडे बहुमत असून आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस उमेदवार इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgadhi) यांचा उमेदवारी अर्ज आज दुपारी सादर करण्यात आला, प्रतापगढी यांनी यावेळी मराठीतून शपथ घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, आमदार अमिन पटेल, आमदार झिशान सिद्दीकी, आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष सुनील देशमुख, सरचिटणीस देवानंद पवार आदी उपस्थित होते.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आमचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी फॉर्म भरताना मराठीतून शपथ घेतली. देशाची एकात्मता मानणारा, त्या विचारला मानणारा, भाषेला मानणारा उमेदवार दिल्याबद्दल मा. सोनियाजी आणि राहुलजी गांधी (Rahul Gandhi) यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. काँग्रेस (Congress) पक्ष हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, पक्षात लोकशाही असून प्रतापगढी यांच्या उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. एका तरुण आणि उत्साही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले आहे. राज्यसभा उमेदवारीवरून हायकमांड यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी स्वागतच केले आहे. त्यांच्या उमेदवारीवरून जी चर्चा सुरु आहे ती निरर्थक आहे. भाजपामध्ये तर लोकशाहीच नाही, मत मांडण्याचाही अधिकार त्यांच्या पक्षात नाही. त्यामुळे त्यांच्या टिकेकडे आम्ही फारसे गांभिर्याने पहात नाही.