भाजपने घोडेबाजार करून विजय मिळविला; विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर पटोलेंचा आरोप

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपानं जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत, तर अकोल्यामधून भाजपाच्या वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळवला आहे. राज्यात सत्ता असून देखील नागपूर आणि अकोला या चर्चेतल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीतील सत्ताधारी पक्षांना पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.

विधानपरिषदेच्या निडणुकीत नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांचा पराभव झाला आहे. बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना फक्त 1 मत मिळाल्याचे समोर आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

दरम्यान, काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले (nana patole) यांनी विदर्भातील विधान परिषदांच्या निवडणुकीच्या निकालावर नागपूर येथे भाष्य केले. नाना पटाेले म्हणाले भाजपने घोडेबाजार करून हा विजय मिळविला आहे. घोडेबाजार होणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. स्वतःचे मतदार त्यांनी बाहेर नेले. त्यांचा आपल्या मतदारांवर विश्वास नव्हता. त्यामुळेच पर्यटनावारी करावी लागली. असाे. जाे निकाल आला त्याचे स्वागतच करायला पाहिजे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुम्ही राजीनामा द्यावा असे म्हटले आहे. यावर नाना पटाेले म्हणाले त्यावर आत्ता बाेलणे उचित ठरणार नाही. याचे उत्तर जररु नंतर दिले जाईल. दरम्यान उमेदवार बदलणे ही आमची स्ट्रटजी होती. त्याचा आमच्या उमेदवारावर काहीही परिणाम झाला नाही असे पटाेले यांनी स्पष्ट केले.