राहुल गांधींच्या मुंबईतील सभेवर प्रश्नचिन्ह; सभेसाठीची याचिका काँग्रेसकडून मागे

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर काँग्रेसचं मिशन मुंबई सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी हे काँग्रेस स्थापना दिनी म्हणजे 28 डिसेंबर रोजी त्यांची मुंबईत सभाही घेणार होते मात्र,  काही कारणामुळे प्रशासनाने  राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारली आहे.

राहुल गांधी यांची 28 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये सभा घेण्यात येणार होती. महाराष्ट्र काँग्रेसकडून त्याबाबत जय्यत तयारीही सुरु करण्यात आली होती. त्यानुसार काँग्रेसकडून मुंबई महापालिका, नगरविकास खात्याकडे सभेच्या परवानगीसाठी 15 दिवसांपूर्वीच अर्ज केला होता. प्रशासनाच्या या निर्णयामुळे काँग्रेस नेते चांगलेच नाराज झाले होते.

याच नाराज नेत्यांनी या सर्व  घडामोडी घडल्यानंतर थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. दरम्यान, आता काँग्रेसकडून ही याचिका मागे घेण्यात आली आहे. न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी बिनशर्त याचिका मागे घेतली आहे. मात्र सरकारने परवानगी दिली की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. दरम्यान आज दुपारी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हे पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत.