साधु-संतांच्या पवित्र महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्याचा पवार-ठाकरेंचा कुटील डाव – भोसले

मुंबई – राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्य सरकार टीकेची धनी बनले आहे. शिवरायांच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवले जात असल्याचे सांगत विरोधकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सुजाण नागरिक या निर्णयावर टीका करत आहेत. महत्वाचं म्हणजे सोशल मिडीयावर देखील सरकारच्या या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, आधी मंदिरे बंद ठेऊन दारुची दुकाने उघडली, नंतर बारमालकांना सवलत देण्यासाठी शरद पवारांचा आटापिटा❗आणि आता तर थेट किराणा दुकानातून दारु विकली जाणार❗ साधु-संतांच्या पवित्र महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ बनविण्याचा पवार-ठाकरेंचा कुटील डाव आम्ही कदापि सहन करणार नाहीत❗