हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं… फायर है..!

मुंबई – राज्यातील भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केल्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या सर्व आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आमदारांना अधिवेशनाबाहेर निलंबित करण्याचा ठराव ‘असंवैधानिक’, ‘बेकायदेशीर’ आणि ‘विधानसभेच्या अधिकारांच्या पलीकडे’ आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

एका अधिवेशनापेक्षा जास्त काळा निलंबन सभागृहाच्या अधिकारक्षेत्रात नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे असा निर्णय घेणं असंविधानिक असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाला हा धक्का मानला जात आहे. येत्या मार्च महिन्यात राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून या निर्णयामुळे भाजपच्या १२ आमदारांचा पुन्हा विधानभवनात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे भाजपला महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या निमित्ताने पुष्पा सिनेमातील एक डायलॉग पोस्ट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, महा बिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलंय.. कायदा- नियम पायदळी तुडवून #bjp १२ आमदारांचे निलंबन केले पण सुप्रीम कोर्टानं निलंबन रद्द केलंय. महा बिघाडी सरकार किती असंविधानिक आणि खुनशी वागतंय हे स्पष्ट झालंय. हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं… फायर है..! असं म्हणत वाघ यांनी सरकारला डिवचले आहे.