पक्ष धोरणाच्या विरोधात कारवाया केल्यामुळे त्या ९ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची विधानसभा अध्यक्षांकडे याचिका – पाटील

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ सदस्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्ष धोरणाच्या, हिताच्या विरोधात कारवाया करत शपथ घेतली ती त्यांची कृती बेकायदेशीर असून पक्षाला अंधारात ठेवल्याने याबाबत एका सदस्याने शिस्तभंग समितीकडे तक्रार केली त्यानंतर समितीच्या सूचनेवरून त्या ९ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे ईमेलद्वारे दाखल केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान त्यांचे तात्काळ सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांना ईमेल आणि व्हॉटस्ॲपवरद्वारे आणि त्यांच्या आय मेसेजवरदेखील पाठवण्यात आले आहे. सदस्यत्व रद्द करण्याच्या याचिकेवर लवकरात लवकर बाजू ऐकून घ्यावी अशी विनंतीही केली आहे. याशिवाय निवडणूक आयोगालाही याबाबत कळवण्यात आले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते शरद पवारसाहेबांसोबत (Sharad Pawar) आहेत. सर्व जिल्हयातील पक्षाचे अनेक पदाधिकारी समर्थनासाठी बाहेर आले आहेत. ९ आमदार म्हणजे पार्टी होऊ शकत नाही. त्यांनी जी शपथ घेतली आहे ती पक्षाच्या अध्यक्षांना न सांगता केलेली कृती आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर पावले उचलेल असे जाहीर केले होते त्यानुसार पावले आम्ही उचलली आहेत.विधानसभा अध्यक्ष याबाबत आम्हाला लवकरात लवकर सुनावणीला बोलवतील अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.