राष्ट्रवादीनंतर आता कॉंग्रेसमध्ये होणार भूकंप ? अनेक नेते देखील भाजपा बरोबर जायला उत्सुक ?

पुणे – राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक मोठा गट भाजप शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाला आहे. राजभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

या घडामोडींवरून राज्याच्या राजकारणात भूकंप आला असताना आता भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या घडामोडींवर लक्ष्यवेधी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, अकेला देवेंद्र क्या करेगा या दर्पोक्ती पूर्ण वाक्याला आजच्या घटनेने मोठी चपराक दिली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास सबका प्रयास या धोरणाला अनुसरून भारताच्या प्रगतीसाठी अनेक पक्ष भाजपासोबत यायला तयार आहेत. तर्कशून्य आधारावर उभी राहिलेली वज्रमूठ आज पूर्ण मोडून पडलेली आहे.

येत्या काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्ष निर्विवाद वर्चस्व गाजवतील आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्र काम करतील हा मला विश्वास आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षातील अनेक नेते देखील भाजपा बरोबर यायला उत्सुक आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सर्वांनी विकासासाठी जे कोणी बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्यासाठी सतत काम करीत राहू. असे जगदीश मुळीक यांनी म्हटले आहे.