PM Narendra Modi | जॉर्जिया मेलोनी यांच्या आमंत्रणावरून मोदी दोन दिवस इटली दौरा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पदभार स्विकारल्यानंतर ते काल पहिल्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इटलीमध्ये होत असलेल्या जी ७ देशांच्या शिखर परिषदेत ते आज सहभागी होणार आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (PM Georgia Meloni) यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान (PM Narendra Modi) दोन दिवस इटली दौरा करणार आहेत.

भारत जी७ परिषदेचा सदस्य नसला तरीही आमंत्रित देश म्हणून सहभाग नोंदवणार आहे. इटली दौऱ्यावर जाण्यापुर्वी पंतप्रधानांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये, उभय देशांची धोरणात्मक भागीदारी आणि हिंद प्रशांत आणि भूमध्य प्रदेशात सहकार्य वाढवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिलाच दौरा इटलीचा होत असल्याचा आनंद होत असल्याचं त्यांनी नमूद केले.

गेल्या वर्षी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या दोन भारतभेटींमध्ये द्वीपक्षीय धोरणाला गती मिळाली होती. आमंत्रित देशांच्या सत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, उर्जा, अफ्रिका आणि भूमध्य देशांविषयी चर्चा होईल, असंही या निवेदनामध्ये म्हटलं आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी२० देशांच्या शिखर परिषदेचे परिणाम आणि आगामी जी ७ परिषद यांच्यात समन्वय साधण्याची आणि जगाच्या दक्षिण भागासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर विचारविनिमय कऱण्याची संधी या परिषदेमुळे मिळेल असंही पंतप्रधानांनी या निवेदनात म्हटले आहे. परिषदेच्या अध्यक्ष देश असलेल्या इटलीनं भारताबरोबरच अल्जेरिया, अर्जेंटिना, ब्राझील, इजिप्त, केनिया, मॉरिटानिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, ट्युनिशिया, तुर्की, संयुक्त अरब अमिराती आणि संयुक्त राष्ट्रांसह काही आंतरराष्ट्रीय संस्थांना आमंत्रित केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप