युती सरकारने करून दाखवले! राज्यात ४० हजार कोटींचे प्रकल्प, सव्वा लाख रोजगार निर्मिती

 भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी केले शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन   

पुणे (प्रतिनिधी) – शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde – Fadnavis Government) राज्यात ४० हजार कोटींच्या नव्या प्रकल्पांना मान्यता दिल्यामुळे राज्यात रोजगाराच्या सव्वा लाख संधी निर्माण होणार आहेत. राज्याला आणखी प्रगतीपथावर नेणाऱ्या या निर्णयाबद्दल  भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे  पत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई येथे प्रकल्पांच्या जागा निश्चित करून आपण शब्दाला जागणारे आहोत, हेच शिंदे-फडणवीस सरकारने दाखवून दिल्याचेही मोहोळ यांनी म्हटले आहे.

मोहोळ यांनी पत्रकात म्हटले आहे की, ‘ठाकरे सरकारप्रमाणे हे केवळ कागदावरचे करार नव्हेत, तर त्यांच्या जागादेखील निश्चित करण्यात आल्या आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई या भागांत उभ्या राहणाऱ्या या विशाल प्रकल्पांमुळे राज्याच्या भौगोलिक विकासाचा अनुशेष दूर होण्यासही मदत होणार आहे. रायगड येथे परफॉर्मन्स केमिसर्व कंपनीचा २७०० कोटींचा प्रकल्प होणार आहे, तर नंदुरबार येथे जनरल पॉलिफिल्म्सचा ५०० कोटींचा प्रकल्प होणार आहे. विप्रो परी रोबोटिक्सचा ५४४ कोटींचा प्रकल्प सातारा येथे तर ११० कोटींचा गणराज इस्पात प्रकल्प अहमदनगर येथे सुरू होणार आहे’.

‘महाविकास आघाडीच्या नावाने सत्ता हडप करून राज्याच्या सर्व क्षेत्रातील विकासाला खीळ घालण्याच्या ठाकरे सरकारच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची देशाच्या उद्योगक्षेत्रात पिछेहाट झाली. खंडणीखोरी, दमदाटी, प्रकल्पांना मान्यता देण्यापासून सुविधा देण्यापर्यंतच्या धोरणातील उदासीनता अशा अनेक कारणांमुळे ठाकरे सरकारने कागदावर केलेले करार प्रत्यक्षात आलेच नाहीत, उलट, महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्रात अविश्वासाचे वातावरण तयार करून उद्योगांनी राज्याबाहेर जावे असेच राजकारण केले गेले. शिंदे – फडणवीस  सरकारमुळे  महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्योगस्नेही होत असून थेट विदेशी गुंतवणुकीत राज्याने पुन्हा पहिला नंबर पटकावला आहे, असेही मोहोळ यांनी म्हटले आहे.

अस्मितापुरुषांचा गौरव

राजधानी मुंबईच्या विकासात मानाचा तुरा खोवणाऱ्या वरळी-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू’ असे नाव तसेच शिवडी न्हावाशेवा सेतूला अटलबिहारी वाजपेयींचे नाव देऊन युती सरकारने या थोर राष्ट्रपुरुषांचा गौरव केल्याबद्दल मोहोळ यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले.