राहुल गांधींना मणिपूरच्या लोकांना भेटू न देणे ही हुकुमशाही:- नाना पटोले

मुंबई- मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाचार (manipur voilence) ५२ दिवसानंतरही शमलेला नाही आणि पंतप्रधानही या हिंसाचारावर साधा ‘म’ सुद्धा काढत नाहीत हे या देशाचे व मणिपूरी जनतेचे दुर्भाग्य आहे. ‘रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता’ या प्रवृत्तीलाही लाजवेल एवढा असंवेदनशील पंतप्रधान भारताला लाभला आहे. केंद्र सरकार स्वतः काही करत नाही आणि विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) मणिपूरच्या जनतेची विचारपूस करण्यास जात असताना त्यांना रोखले जाणे हे मोदींच्या हुकुमशाही कारभाराचा नमुना आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांना रोखल्याबद्दल भाजपा सरकारचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. मणिपूरची जनता केंद्र सरकारच्या मदतीची आस लावून बसली आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मणिपूरला जळत ठेवून अमेरिकेच्या दौऱ्यावर चमकोगिरी करत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी मणिपूरच्या लोकांचे दुःख जाणून घेण्यासाठी गेले होते. राहुल गांधी यांना रस्ते मार्गाने जाण्यास सुरुवातीला परवानगी दिली, मणिपूरची जनता हजारोंच्या संख्येने राहुल गांधींचे स्वागत करण्यास उभी होती. राहुल गांधी यांची लोकप्रियता पाहून भाजपा सरकार घाबरले व त्यांचा ताफा अडवून त्यांना परत पाठवले. राहुल गांधींना परत पाठवून स्थानिक लोकांवर पोलीसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. मणिपुरी जनता मोठ्या संख्येने राहुल गांधींना भेटण्यासाठी आलेली होती पण भाजप सरकारने त्यांना लोकांना भेटू दिले नाही. मोदी सरकार राहुल गांधी यांना घाबरले आहे हे पुन्हा स्पष्ट झाले. राहुल गांधी प्रेम, बंधुभाव आणि शांततेचा संदेश घेऊन मणिपूर येथे पोहचले होते पण मोदी सरकारला मणिपूर शांत व्हावे असे वाटत नसावे म्हणूनच राहुल गांधींना रोखण्यात आले.

मणिपूर जळत असताना पहिले २५ दिवस केंद्राचा एकही प्रतिनिधी मणिपूरला गेला नाही. २५ दिवसानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरला जाऊन आले पण मणिपुरच्या जनतेचा भाजपा व मोदी सरकारवर विश्वासच नाही म्हणून आजही मणिपूर जळत आहे. मणिपूरच्या आजच्या परिस्थितीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहे. पोलीस स्टेशनवर हल्ले होऊन शस्त्रास्त्र पळवली जात आहेत. प्रार्थना स्थळे जाळली जात आहेत. जीवित व वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली आहे पण मनमानी, लहरी, अडेलतट्टू स्वभावाचे केंद्र सरकार मात्र मणिपूरला अग्निकांडात होरपळत सोडून भाषणबाजी, इव्हेंटबाजी व जाहिरातबाजीत मग्न आहे. मणिपूरच्या लोकांना राहुल गांधींना भेटू न देण्याच्या भाजपा सरकारल्या भूमिकेला केवळ मणिपूरच नाही तर देशातील जनताही माफ करणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.