राज ठाकरे कधी एअरपोर्टवर भेटले तर हिसका दाखवेन- बृजभूषण सिंह

लखनौ – मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा ‘तूर्तास’ स्थगित केला असला तरी भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी आपली तलवार अजून पूर्ण म्यान केलेली नाही. गेली आठ वर्षं मी राज ठाकरे यांना शोधतोय, ते कधी विमानतळावर भेटले तर दाखवेन हिसका असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. बृजभूषण सिंह म्हणाले, राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयंविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल, मारहाणीबद्दल माफी मागत नाहीत तोपर्यंत अयोध्येत पाय ठेवू देणार नाही. आम्ही रामाचे वंशज आहोत, त्यांनी रामाच्या वंशजांचा अपमान केला आहे. राज ठाकरे उत्तर भारतात कोणत्याही राज्यात गेले तरी त्यांना विरोध करण्यात येईल असेही बृजभूषण यांनी सांगितले.

दरम्यान, अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असा आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेत केला. ही रसद शरद पवारांनी पुरवल्याचा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला होता. आता मनसे नेत्यांकडून एक फोटो शेअर करण्यात  या फोटोच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे बोट दाखवण्यात आले आहे.

या फोटोत राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार (Sharad Pawar) -सुप्रिया सुळे (Supriya Sule) एकत्र पाहायला मिळतायत. मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी काही फोटोज सोशल मीडियात शेअर केले आहेत . राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधामागे पवारांचा हात होता असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न मनसेकडून सुरुय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमध्ये झाल्याचं दिसत आहे.