राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत; कॉंग्रेसचा दावा 

मुंबई  – विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना मेरिटनुसारच जागा वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे.प्रत्येक जागेचा सखोल अभ्यास करुन जागा वाटपावर चर्चा केली जाईल. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हाच काँग्रेसचा निर्धार असून तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून जागा वाटप निश्चित केले जाईल,असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर पटोले यांनी पत्रकार परिषदेतला संबोधित केले.

यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या मनमानी, अत्याचारी सरकारला खाली खेचणे हाच महाविकास आघाडीचा निर्धार आहे.जागा वाटपावरून मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. २०१४, २०१९ व आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. २ व ३ तारखेला काँग्रेस पक्ष प्रत्येक जागेचा आढावा घेऊन त्याबाबतचा निर्णय घेईल. महाराष्ट्र काँग्रेस विचाराचे राज्य आहे, विदर्भातही काँग्रेसचा जनाधार वाढलेला आहे. मागील तीन वर्षात आम्ही सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला मागे टाकत विजय मोठा संपादन केला आहे. भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्व बाजूंचा विचार करुन जागा वाटप होईल.

महापुरुषांचा अपमान होत असताना भाजपाची तोंडे बंद का होती?

भारतीय जनता पक्षाने सातत्याने महापुरुषांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्याबदद्ल भाजपाच्या मंत्र्यांनी केलेली विधाने जनता विसरलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेली अवमानजनक वक्तव्ये भाजपाला मान्य आहेत का? महापुरुषांचा अपमान करत असताना भाजपाची तोंडे बंद का होती? भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. उलट राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यावर भाजपाने नाहक आरोप करणे बंद करावे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपा नेत्यांनी जनतेची माफी मागितलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपतींच्या स्मारकाचे उद्घाटन केले त्याचे काय झाले? याचे उत्तर आधी द्या. भाजपाला महापुरुषांच्या विचारांशी काहीही देणेघेणे नाही. भाजपा त्यांचा फक्त मतांसाठी वापर करते. भाजपाने त्यांचे थोतांड बंद करावे.
भाजपाचे हिंदुत्व नकली आहे. गोव्यात गोमातेबद्दल काय भुमिका आहे आणि महाराष्ट्रात काय भूमिका आहे हे सर्वांना माहित आहे. स्वतःच्या सोईने हिंदुत्वाचा वापर करणाऱ्या भाजपाची खरा चेहरा जनतेला माहित आहे. त्यावर त्यांनी आम्हाला शिकवू नये.

विस्तारीत कार्यकारिणीत विविध ठराव मांडून मंजुर केले..
कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमतांनी विजयी केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरमय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून तो मंजूर करण्यात आला.
खारघर प्रकरणात उन्हात तडफडून मृत्यू झाल्याप्रकरणी सरकारने अद्याप कोणतीच कारवाई केली नाही. सरकारच्या अनास्थेचे हे बळी आहेत. सरकारने अजून गुन्हे दाखल केले नाहीत. सरकारच्या या कृतीचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

एमपीएसी सातत्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत आहे. मध्यंतरी मुलांना आंदोलनही करावे लागले. आताही टंकलेखन परिक्षेत आयोगाने गोंधळ घातला. या सर्व प्रकरणामागे कोण आहे याचा चौकशी झाल पाहिजे. यासंदर्भात निषेधाचा ठराव मांडण्यात आला होता.

राज्यातून महिला व मुली मोठ्या संख्येने बेपत्ता होत आहेत परंतु पोलीस प्रशासन मात्र त्यावर कारवाई करत नाही. पोलीस प्रशासन व राज्य सरकारच्या या उदासीन वृत्तीचा निषेध करणारा ठराव मांडण्यात आला.दिल्लीत महिला कुस्तीपटू आंदोलन करत आहेत, या आंदोलनाला पाठिंबा देणारा ठराव करण्य़ात आला तसेच पंतप्रधान या महिला कुस्तीपटूंशी चर्चा करण्यासही तरया नाही. भाजपा सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यात आला.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप सरकारी मदत पोहचलेली नाही, शेतकऱ्यांना लवकर मदत मिळाली पाहिजे पण सरकार ती देत नाही. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधाचा ठराव करण्यात आला.

कोऱ्हाडी उर्जा प्रकल्पाला विरोध होत आहे. त्यासंदर्भात जनसुनावणी दुपारी १२.३० वाजता ठेवण्यात आली आहे. सरकारने दुपारी कार्यक्रम घेऊ नये असा कायदा केला असताना सरकारच कायदा मोडत आहे. ही जनसुनावणी संध्याकाळी घ्यावी. यासंदर्भातही ठराव मांडण्यात आला.

प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे. माजी मंत्री नीतीन राऊत, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, हुसेन दलवाई, खासदार कुमार केतकर, AICC चे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.