महाराष्ट्रात जन्मलात, वाढलात तर मराठी यायलाच हवं; ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माचं वक्तव्य चर्चेत
सुदीप्तो सेन दिग्दर्शक असलेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा हिने प्रमुख भूमिका साकारली आहे. या भूमिकेने तिला वेगळी ओळख मिळाली. तिच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच मराठी भाषेबद्दल तिने मांडलेलं मत चर्चेत आलं आहे.
अदा म्हणाली, “मला मराठी भाषा खूप आवडते. मला मराठी कविता आवडतात आणि त्या मी अनेक वर्षांपासून म्हणत आले आहे. शाळेतही मराठी हा माझा आवडता विषय होता. मला आणि माझ्या पालकांना असं वाटतं की, जर तुम्ही महाराष्ट्रात जन्मला आहात, वाढला आहात तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे. प्रत्येकालाच मातृभाषेबरोबरच देशभरातल्या शक्य तितक्या इतर भाषांची प्राथमिक माहिती असायला हवी.”