राहुल गांधी यांच्या सभेत राडा होणार? हजारो मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना 

मुंबई – गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्या सावरकरांचा अपमान करणाऱ्या विधानांची जोरदार चर्चा चालू आहे. हिंगोलीतील भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राज्यातील राजकाराण तापले आहे.

मनसेने काँग्रेसची शेगावमधील सभा उधळण्याचा इशारा दिला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यभरातून मनसैनिक शेगावच्या दिशेने निघाले आहेत. औरंगाबादमध्ये नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे उपस्थित आहेत. येथून मनसे कार्यकर्ते लवकरच शेगावच्या दिशेने निघणार आहेत. औरंगाबादहून निघालेल्या मनसे कार्यकर्त्यांना वाटेत पोलिसांकडून धरपकड होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत असणाऱ्या शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न भाजपाकडून उपस्थिक केला जात होता. यावर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर आता संजय राऊतांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रात येऊन सावरकरांची बदनामी करणं हे आम्हाला आणि काँग्रेसलाही मंजूर नाही. इथे येऊन सावरकरांवर बोलण्याची काही गरजच नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते. हे मी तुम्हाला सांगतो, असा इशारा देतानाच सावरकर हे आमचं श्रद्धाचं स्थान आहे, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका केल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांची अवस्था बिकट झाली आहे. महाराष्ट्र आणि देशातील लोकांना सावरकरांबद्दल आदर. इतिहासात काय घडलं आणि काय नाही हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा. त्या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावं, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या.