आफताबला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे मूक समर्थन आहे का?

मुंबई: श्रध्दा वालकर हिंदू होती म्हणून तुम्ही बोलत नाही की, आफताब मुस्लिम होता म्हणून? तुमचे आफताबला मुक समर्थन आहे का? असा थेट सवाल शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला विचारत भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज जोरदार हल्लाबोल केलाजागर मुंबईचा यातील सहावी सभा आज बोरिवली येथे झाली. या सभेला खा. गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे यांनी संबोधित केले तर जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्य वक्ते म्हणून बोलताना आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले की, ज्या घरामध्ये तरुण मुलगी आहे ते घर आज अस्वस्थ आहे. आमच्या घरातली असावी अशी श्रद्धा वालकर नोकरी करते. आफताब नावाचा नराधम तिचे ३५ तुकडे करतो. तो तिचे धड कापून फ्रीजमध्ये ठेवतो. अशी दुर्भाग्य श्रद्धा वालकर तुमच्या आमच्यात होवून नये. आम्हाला त्यावर राजकारण करायचे नाही पण सवाल हा आहे की, मृत्युमुखी श्रद्धा झाली पण मारणारा आफताब होता? हाच प्रश्न मानवतावादी दृष्टिकोनातून उभा करणारे शबाना आझमी, मेधा पाटकर, जावेद अख्तर, शरद पवार, राहुल गांधी, मेधा पाटकर यांची बोबडी बंद पडली आहे. हा लव्ह जिहाद आहे. मुस्लिम मुलं हिंदू मराठी मुलींना पळवून नेवून असे नराधम कृत्य करतात. लांगूलचालन आणि तुष्टीकरण वाढल्यावर हेच चित्र होते. आमचा सवाल आदित्य ठाकरे यांना आहे? तुम्ही याचा निषेध का नाही केला? का आंदोलन केले नाही? श्रद्धा हिंदू आहे म्हणून की आफताब मुसलमान आहे म्हणून.. तो होवू नये पण दुर्दैवाने कुठल्या मुस्लिम मुलीचा खून झाला असता तर या देशातील सगळे गळे काढत उभे राहिले असते. हिंदू आणि मराठी मुलीचा खून झाल्यानंतर उद्धव ठाकरे निषेधाचा सूर काढत नाहीत कारण त्यांना मुस्लिम मताची गरज आहे. आफताबला फाशी झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. मुस्लिम मतासाठी शिवसेनेने मौन बाळगले आहे. उद्याची परिस्थिती तुमच्यावर येऊ नये यासाठी हा जागर करतो आहोत.

आशिष शेलार म्हणाले, बोरिवलीने मुंबईला समर्थ नेतृत्व दिले आहे. हा केवळ मतं मिळविण्यासाठी जागर नाही. मुंबईकरांचे भविष्य असुरक्षित होऊ नये त्याकरिता जागर आहे. हिंदू आणि नव हिंदू अशी मांडणी केली जात आहे. जागर त्याच्या विरोधात आहे. बोरिवलीने मुंबईला समर्थ नेतृत्व दिले आहे. मराठी मुस्लिम असे तुष्टीकरण आणि लांगूलचालन करून वेगळी चूल मांडली जात आहे. जे ओवेसिला जमले नाही ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखविले. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनचं थडगे यांनी सुरक्षित केले. दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज्याकडे पुरावे मागितले जातात. औरंगजेबाचे स्वप्न उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले. मातोश्रीच्या अंगणातून सुरू केलेला जागर मुंबईच्या गल्ली गल्लीमध्ये पोहोचला आहे. ते पुढे म्हणाले, २२ ऑक्टोबरला सामनामध्ये मराठी मुस्लिमांचे आम्ही स्वागत करत आहोत असे लिहिले गेले. आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आम्ही आहोत. मुस्लिम मराठी अशी मांडणी केली जात आहे. मराठी गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे? असा सवाल ॲड. आशिष शेलार यांनी केला. प्रत्येक वार्डात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मराठी आणि मुस्लिम मताचं गणित जुळवलं जात आहे. सलग २५ वर्ष राज्य करून तुम्हाला जाती धर्माच्या आधारावर मतं मागण्याची वेळ का आली? केलेल्या कामाच्या आधारावर मतं मागा? सांगा तुम्ही किती प्रकल्प केले, रस्ते बांधले, किती शाळा बांधल्या? यातील काहीही त्यांना सांगता येत नाही. मुंबई महापालिकेची सत्ता हातातून जात असल्याने शेवटचा डाव हा रडीचा म्हणजेच कलीचा डाव खेळला जात आहे. जाती आणि धर्माच्या आधारावर मतं मागण्याचा कार्यक्रम हा अजेंडा उद्धव यांच्या शिवसेनेचा आहे. मराठी आणि मुस्लिमांना फसवण्याचे काम सुरू आहे. हिंदू मराठी आणि मुस्लिम मते भारतीय जनता पार्टीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिंदुत फूट पाडण्याचे काम सुरू आहे ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिला.

खा. गोपाळ शेट्टी म्हणाले, सातत्याने मुंबई महापालिकेत चुकीच्या गोष्टींच्या विरोधात बोलण्याचे काम केले आहे. १९९८ मध्ये मुंबई महानगरपालिका तोट्यात होती. त्यानंतर भाजपाच्या मदतीनेच पालिका फायद्यात आली. एवढ्या मोठ्या मुंबईत लहान मुलांना खेळण्यासाठी एकही मैदान नाहीये. मुंबई शहराची दयनीय अवस्था झाली आहे. फेरीवाला धोरण राबविण्यात अपयशी ठरले आहेत. भारतीय जनता पार्टीचा मुंबईत महापौर झाल्यावर फेरीवाल्यांचा सन्मान केला जाईल.

५०० चौरस फूटखालील घराना करमाफी देवू. एसआरए प्रकल्पांना गती दिली जाईल. बाळासाहेब ठाकरे यांचे स्टेडियम बनवण्यासाठी बोरिवलीत आरक्षित ठेवलेल्या भूखंडावरही शिवसेनेने स्टेडियम बनवून दिले नाही. एवढ्या कोत्या मनाचे हे लोक आहेत. येणाऱ्या काळात मुंबईकरांच्या राहणीमानाचा दर्जा आम्ही बदलवू. जे २५ वर्षात झाले नाही ते ५ वर्षांत करण्यासाठी महापालिकेत बदल हवा आहे असेही ते म्हणाले.