पक्षासाठी काय पण! नाकाला ऑक्सिजनची नळी, बोटाला ऑक्सिमीटर आणि व्हिलचेअर… गिरीश बापट कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचारात

Pune: पुण्यातील कसबा (Kasba Bypoll Election) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll Election) पोटनिवडणूंकाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सत्तांतरानंतर जनतेतून होणारी ही राज्यातील पहिलीच निवडणूक असलेल्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसब्यातून भाजपाने स्व. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातून उमेदवार न देता हेमंत रासने (Hemant Rasne) यांना मैदानात उतरवले आहे. रासने यांच्या प्रचारासाठी भाजपासहित शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सहित इतर घटक पक्ष दिवसरात्र एक करत आहेत.

अशातच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात कसब्याचे ‘किंगमेकर’ खासदार गिरीश बापट (Girish Bapat) सक्रिय झाले आहेत. प्रकृती बरी नसतानाही गिरीश बापट यांनी प्रचारात उतरण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत कसब्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा केसरीवाड्यात पार पडला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच बापट जाहीरपणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिसले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांची भेट घेतल्यानंतर चोवीस तासांतच बापट यांच्या उपस्थितीत मेळावा झाला आहे.

दोन दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण देत कसबा पोटनिवडणुकीच्या (Kasaba By Election) प्रचारात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे सांगितलं होतं. मात्र, कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि महाविकास आघाडीत (BJP vs Mahavikas Aghadi) अटीतटीची लढाई सुरु असल्याने गिरीश बापट आजारपण बाजुला सारून आपल्या पक्षासाठी प्रचाराच्या मैदानात उतरलेत. नाकात ऑक्सिजनची नळी आणि बोटाला ऑक्सिमीटर लावून व्हिलचेअरवरुन गिरीश बापट कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उपस्थित आहेत.