महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’; राज ठाकरेंनी केलं योगी सरकारचं कौतुक

लखनौ – मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (MNS chief Raj Thackeray)  घेतलेली आक्रमक हिंदुत्वाची भूमिका सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे. मुंबई, ठाण्यातल्या सभा आणि पुण्यातील ‘हनुमान चालिसा’ पठणानंतर आता औरंगाबादेतही राज ठाकरेंची सभा होणार आहे. आतापर्यंत झालेल्या सभांमधून राज ठाकरे यांनी भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला असून हा मुद्दा केवळ राज्यातच नव्हे तर देशभर चर्चेत आला आहे.

राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावर अनेक राज्यात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली मात्र उत्तर प्रदेशात योगी सरकारने (Yogi Aadityanath) न्यायालायाच्या निकालाचे पालन करण्याचे ठरवले आणि अनधिकृत भोंग्यावर कारवाईचा धडाका लावला. उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे.

मागील चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्याविरोधातील मोहीम सुरु करण्यात आली.
मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विषयासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक मान्यतांचं पालन करण्याचा अधिकार आहे. मात्र त्याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे, असं मत व्यक्त केले.

दरम्यान, या कारवाईचं राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचं मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी आहेत. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरेंनी हे ट्वीट टाकताना #Azaan आणि #Loudspeakers हे दोन हॅशटॅग दिले आहेत. सोबतच अभिनंदनाचं पत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत ट्वीट केलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला तीन मे चा अल्टिमेटम दिला आहे. भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारनं निर्णय घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. राज ठाकरे यांच्या या घोषणेनंतर राज्यासह देशभरात वातावरण ढवळून निघालं आहे.