राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ, अनधिकृत बांधकामप्रकरणी आता महापालिकेची नोटीस

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसेचं (Hanumaan chalisa)  पठन करण्याची भूमिका घेतल्यामुळे चर्चेत आलेल्या नवनीत आणि रवी राणा ( Navneet -Ravi Rana)  या खासदार-आमदार दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आहे. राणा दाम्पत्यावर सामाजिक तेढ निर्माण करणारी विधानं केल्याचा, पोलिसांच्या कामात अडथळे आणल्याचा गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, नवनीत राणा, रवी राणांच्या अडचणी आता पुन्हा वाढल्या आहेत. खार येथील त्यांच्या घरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी आता राणा दाम्पत्याला महापालिकेने नोटीस बजावली आहे. हनुमान चालीसा प्रकरणी राणा दाम्पत्य कारागृहात असताना आता महापालिकेने त्यांना नोटीस बाजावली आहे. खार येथील घरात बेकायदेशीर बांधकाम झाले आहे, का याची पाहणी महापालिकेचे अधिकारी करणार आहेत.

खार पश्चिममधील परिसरातील १४ व्या रस्त्यावर ‘लाव्ही’ इमारतीत राणा दाम्पत्यांचे घर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा वाचण्यास जाण्यासाठी हे दाम्पत्य मुंबईत आले, तेव्हा याच इमारतीत उतरले होते. या इमारतीत तसेच काही घरांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिक बांधकाम करण्यात आल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. पालिका नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार नोटीस पाठवली आहे.