राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सोशल मीडियावरील डीपी बदलला; प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे केले आवाहन

मुंबई – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजपाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Triranga) अभियान देशपातळीवर राबवले जात आहे. या अभियानाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (pm modi) भाजपाच्या जवळपास सर्वच नेत्यांनी तसेच विरोधकांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी बदलून तिरंगा ठेवला आहे.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर भगवा ध्वजच ठेवण्यात आला होता.यावरून विरोधकांनी संघावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता संघाने आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंटचा डीपी बदलून तिरंगा ठेवला आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मोहन भागवत हे झेंडावंदन करतान दिसत आहेत.’स्वाधीनता का अमृत महोत्सव मनाएँ. हर घर तिरंगा फहराएँ.राष्ट्रीय स्वाभिमान जगाएँ’. असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्साहात साजरा करूया, प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून राष्ट्रीय स्वाभिमान जागृत करू अशा अशयाचं ट्विट संघाच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले आहे.