रोहिणी खडसे म्हणतात, `शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुखांच्या मतदारसंघातच महिला सुरक्षित नाहीत`

जळगाव: राज्यात एकीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) तर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुक्ताईनगर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse),रोहिणी खडसे (Rohini Khadase) आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.

मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटस वरून पुन्हा वाद उफळला असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांच्याशी असभ्य वर्तणूक करून विनयभंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत 24 डिसेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. तर शिवसेनेच्या वतीने याबाबत परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. त्यावर रोहिणी खडसे यांनी मतदारसंघातील महिला सुरक्षित नसल्याचे ट्वीट केले आहे. त्या म्हणाल्या, एका महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या तिच्या अंगावर धावून जाणाऱ्या शिवसेनेच्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रप्रमुखाचा जाहीर निषेध.शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुखांच्या मतदारसंघातच महिला सुरक्षित नाही.काल झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे.

दुसऱ्या बाजूला एकनाथ खडसे व त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्याकडून माझ्या जिवाला धोका असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना रोहिणी खडसे यांनी आता आम्ही आमदारांना चोप देऊ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याच प्रतिक्रियाच्या आधारे त्यांनी हा आरोप केला आहे.

मागील दोन वर्षांपासून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी एकनाथ खडसे व रोहिणी खडसे यांच्यावर नाव न घेता केले. माझ्या जिवाला धोका असून याबाबत पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. एकनाथ खडसेंमुळेच शिवसेना-भाजपची युती तुटली होती. आता महाविकास आघाडी तुटू नये, अशी अपेक्षाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

वाद कसा सुरु झाला ?

जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगर पंचायत निवडणुकीचे मतदान २१ डिसेंबर रोजी पार पडले असून, मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या अंगावर धावून आल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. त्यानंतर रोहिणी खडसें यांनी महिलांची छेडखानी करणाऱ्यांना चोपच नाहीतर तर त्यांचे हात तोडून टाकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा वाद चांगलाच विकोपाला गेला आहे.

यानंतर मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटस वरून पुन्हा वाद उफळला असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी यांच्याशी असभ्य वर्तणूक करून विनयभंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करत 24 डिसेंबर रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.