आरोपीच्या पिंजऱ्यात असणाऱ्या संजय राठोडांवर प्राजक्ता माळीने उधळली स्तुतिसुमने…

यवतमाळ : मनोरंजन क्षेत्र हे असे क्षेत्र आहे ज्यातील कलाकारांना आपल्या देशात ‘हिरो’ समजले जाते. त्यांचे अनुरण तरुण पिढी सर्रास करताना दिसते. त्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरताना या कलाकारांची मोठी कसोटी लागत असते. मग आपण कोणाच्या कार्यक्रमाला जातो, कोणाची स्तुती करतो याचेही भान या कलाकारांना ठेवावे लागते.

आता अभिनेते- अभिनेत्री जाहीर कार्यक्रमांसाठी पैसे आकारतात हे उघड सत्य आहे. त्यामध्ये काही गैरही असण्याचे कारण नाही. पण पैसे घेऊन कार्यक्रम करताना ‘संवेदनशीलता’ नावाचा प्रकार सुद्धा ‘विकला’ जात असेल तर हे खूप गंभीर आहे.

नेते आपली वोट बँक पक्की करण्यासाठी अभिनेते- अभिनेत्री यांचा वापर करत असतातच पण आपण कोणत्या नेत्याची जय-जयकार करतो हे अभिनेते- अभिनेत्री यांनी ठरवण्याची वेळ आली आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

त्याचे कारण असे की, राज्यभर गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यानंतर आपले मंत्रिपद गमवाव्या लागलेल्या माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम प्राजक्ता माळी हिने स्तुतिसुमनांची उधळण केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे माजी मंत्री आणि आमदार संजय राठोड यांनी त्यांच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुल या इमारतींच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्राजक्ता माळी, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलावंत अरुण कदम व समीर चौगुले उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली, संजय राठोड यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलला. कबड्डी खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवणारं हे शहर आता अपराजित आमदार संजय राठोड यांचा मतदारसंघ म्हणून ओळखले जाते. यात सर्वकाही आले.

एकीकडे बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला जेएनयु विद्यापीठात आंदोलनाला गेल्याचा फटका अजून बसत आहे. तिचा तत्कालीन ‘छपाक’ चित्रपट असुदेत किंवा नुकताच प्रदर्शित झालेला ‘83’ या दोन्ही चित्रपटाला #BoycotDipika या हॅशटॅगचा फटका बसला आहे.

तेव्हा आता एका आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या नेत्यावर स्तुरीसुमने उधळल्याने प्राजक्ता माळीला प्रेक्षक कसे स्वीकारतात हे पाहावे लागणार आहे. मात्र दुसरीकडे अशा सेलिब्रिटीने ‘सुपारी’ घेताना काही संवेदनशील ‘सीमा’ स्वतःहून आखून घेणे गरजेचे आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.