विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस नेत्याचं नाव आजच जाहीर होण्याची शक्यता

मुंबई : राज्याचं हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. खरतर मागील अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा निकालात काढता आला असता मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या निवडणुकीसाठी फारसे उत्साही असल्याचे दिसून आले नाही. सोबतच कोरोनाच्या स्थितीमुळे बरेच आमदार गैरहजर होते आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक घेतली तर काही दगाफटका होऊ शकतो अशी शंका आल्यानेच ती निवडणूक टळली.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर काँग्रेसचा कोणता नेता विराजमान होणार?, चर्चेत असलेल्या नेत्यांना संधी मिळणार की दिल्ली हायकमांड वेगळ्याच नेत्याच्या डोक्यावर हात ठेवणार? या प्रश्नांची उत्तरं आज मिळण्याची शक्यता आहे.

उद्या आणि परवा, म्हणजे 27 आणि 28 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची नावं चर्चेत आहेत. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार की भाजप उमेदवार देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. उपाध्यक्षपद मिळाल्यास निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत भाजप नेत्यांनी दिलेत.