‘भूक लागल्यावर मिसळ खाल्ली, आणि हो… पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं’

अहमदनगर : मध्य रेल्वेच्या लोकल सेवेतील ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री कपिल पाटील (भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांनी दिवा ते ठाणे लोकल प्रवास केला. यानंतर भूक लागल्यानं ठाणे स्टेशन बाहेरील गजानन वडापाव सेंटरमध्ये नेत्यांसह कार्यकर्त्यांनी वडापाव, भजी खालले. मात्र, या वडापावचे बील न भरताच निघून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल होताच उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. सोशल मीडियावरुन देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. गजानन हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी बील न भरल्याचा दावा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता भाजप नेत्यांना अनोख्या पद्धतीने टोला लगावला आहे. रोहित पवार मतदारसंघात फिरत असताना एका हॉटेल मध्ये थांबले आणि मिसळ खाल्ली त्यांनतर रोहित पवार यांनी ‘मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं.’ असं म्हणत भाजप नेत्यांना चिमटा काढला आहे. ‘मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली… एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं.. आणि हो… मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं.’ असं ट्विट करत पवारांनी रावसाहेब दानवे आणि इतर भाजप नेत्यांना नाव न घेता टोला लगावला आहे.

दरम्यान, दुसरीकडे भाजप नेते बिल न देताच निघून गेल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित हॉटेलकडे धाव घेत बील जमा केलं. बील जमा झाल्यानंतर गजानन हॉटेलच्या मालकांनी या वादावर पडदा टाकला. भाजप कार्यकर्ते भुजबळ यांनी बील दिल्याचं त्यांनी सांगितलं. गैरसमज करुन घेऊ नये, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.