महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी उद्यावर, आजचा युक्तिवाद संपला

नवी दिल्ली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे.  महाराष्ट्रातील याच सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आजचा युक्तिवाद पूर्ण झाला असून उद्या (4 ऑगस्ट) सकाळी हे पहिल्या क्रमांकाचं प्रकरण असेल, असं सरन्यायाधीश रमण्णा (N. V. Ramana) यांनी स्पष्ट केलं.

ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली. आजच्या सुनावणीत मूळ पक्ष कोणता, आमदारांची अपात्रता यावर युक्तिवाद झाला.

सरन्यायाधीश रमण्णा (N. V. Ramana) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी झाली. दरम्यान, उद्या कामकाज सुरु झाल्यानंतर ही सुनावणी पहिल्या क्रमांकावर असेल असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. कोर्टाने शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांना नव्याने लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितलं आहे.