ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण! आयसीयूत उपचार सुरू

ठाणे- ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री आपल्या कार्यालयातून बाहेर पडण्याच्या वेळी शिंदे गटाच्या १५-२० महिला कार्यकर्त्यांनी मिळून रोशनी शिंदे यांना मारहाण केली. या मारहाणीत त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे.

रोशनी शिंदे यांच्यावर हा जीवघेणा हल्ला सोमवारी रात्री १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास झाला. कासरवडवली येथील रोशनी शिंदे यांच्या कार्यालयातून बाहेर पडण्याच्या वेळीच त्यांच्यावर शिंदे गटाच्या महिलांनी हा हल्ला केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. यासंदर्भात कासरवाडवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला, असा आरोपही करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी  ठाकरे गटाकडून आक्रमक पवित्रा घेतला परंतु पोलिसांनी दखल घेतलेली नाही, असे सांगण्यात आले.

रोशनी शिंदे सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. रोशनी शिंदे यांना मुका मार लागला आहे. तसेच त्यांच्या पाठीवर माराच्या खुणा आढळल्या आहेत, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. आलेगावकर यांनी सांगितले. मात्र अंतर्गत रक्तस्त्राव किंवा फ्रॅक्चर आढळलेलं नाही, असे ते यावेळी म्हणाले. ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांनी आपल्यावर ट्रीटमेंट सुरु असतानाही आपल्याला मारहाण करण्यात आली, असा आरोप केलाय. पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड त्रास होत असूनही पोलिसांनी दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केलाय. मात्र माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हे आरोप फेटाळलेत.