वाढदिवसाच्या दिवशी चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा रुपालीताईंनी केला भांडाफोड

मुंबई : राष्ट्रवादीच्या आघाडीच्या नेत्या तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) या झी मराठी वाहिनीवरील ‘हे तर काहीच नाय’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील आणि राजकारणातील अनेक गमतीशीर किस्से सर्वांसोबत शेअर केले. यातील त्यांनी सांगितलेला एक किस्सा चांगलाच चर्चेचा मुद्दा बनला आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चाकणकर यांनी कार्यकर्ते वाढदिवसाच्या दिवशी कसे आपणास कॉल करून शुभेच्छा द्यायला सांगतात हे या कार्यक्रमात सांगितले. त्या म्हणाल्या, कार्यकर्ते हे आदल्या दिवशी फोन करून वाढदिवसाच्या दिवशी आपणास कॉल करावा असं सांगतात पण आपण काहीतरी कामात असल्याने आपण ते विसरतो. मग त्याचाच फोन येतो आणि तो कार्यकर्ता आठवण करून देतो की ताई आज माझा वाढदिवस आहे. मी फोन ठेवल्यावर तुम्ही कॉल करा आणि मला शुभेच्छा द्या असं सांगितले जाते.

पुढे तो कार्यकर्ता काय बोलायचं हे देखील सांगतो, तो म्हणतो की तुम्ही तुमच्या भागात अतिशय चांगले काम करता.तुम्ही फार कर्तुत्ववान आहात. तुमचा जनसंपर्क फार दांडगा आहे. तुमच्यासारखी मौल्यवान माझ्यासोबत आहेत हे मी फार नशीबवान समजते. म्हणून आज तुमचा वाढदिवस आहे हे माझ्या आठवणीने लक्षात राहिलं असं तुम्ही बोलायचं असं सांगितलं जातं. मग पुन्हा मी कॉल करून त्यांनी दिलेल्या स्क्रिप्ट प्रमाणे शुभेच्छा देते असं त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मग हे कार्यकर्ते तो कॉल रेकॉर्ड करून स्क्रीनशॉट घेवून स्टेट्सला ठेवतात. शेवटी आम्हालाही यात आनंद असतो कारण या धावपळीच्या जगात कधीकधी आमच्याकडूनही राहून जाते. शेवटी आपलाच माणूस आपल्यावर हक्क गाजवणारा असतो. त्यामुळे जरी त्यांची भावना तशी असेल तरीही आम्हाला शुभेच्छा देताना मनापासून आनंद होतो असं त्यांनी सांगितलं.