कृषी पंपाचा वीज पुरवठा तात्काळ सुरू करा, आ. चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

वर्धा : हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आज भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देत समस्या जाणून घेतल्या.

यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी साखळी उपोषणाकडे दुर्लक्ष करून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारी अधिकाऱ्यांवर तीव्र रोष व्यक्त केला. गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरू असताना शासकीय अधिकाऱ्यांनी भेट देणे, समस्या समजावून घेणे गरजेचे आहे. परंतु एकाही अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही, ही बाब योग्य नसल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणने थकबाकीच्या नावावर कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे रब्बी हंगामासोबतच उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. शेतीला पाणीच मिळाले नाही तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल अशी भीती यावेळी आ. बावनकुळेंनी व्यक्त केली. यावेळी प्रामुख्याने वर्धा जिल्हाध्यक्ष भाजयुमो जिल्हाध्यक्ष वरुण पाठक, सुनील गफाट, अविनाश देव, अतुल तराळे, किशोर दिघे, प्रशांत बुर्ले, जयंत कावळे, आशिष पर्वत, निलेश पोहेकर उपस्थित होते.