संभाजी ब्रिगेड-‘आप’ची कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार; कलाटेंनी वाढवली मविआची डोकेदुखी

Pune Bypoll election : पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी (pune bypoll election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. यात संभाजी ब्रिगेड पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणूकीतुन माघार घेतली आहे. ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांच्या विनंतीला मान देऊन दोन्ही मतदारसंघाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाने देखील माघार घेतली आहे.

चिंचवडमध्ये तिरंगी लढत
चिंचवडचे राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही आहे. त्यामुळे आता चिंचवडमध्ये (Chinchwad) तिरंगी लढत होणार आहे. राहुल कलाटेंनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र ते निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत.

चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीतून राहुल कलाटे यांनी माघार घेण्याकरिता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. आज सकाळी शिवसेना नेते सचिन अहिर यांनी कलाटे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश बहल व मोरेश्वर भोंडवे यांनी देखील कलाटे यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कलाटे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत.