शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवलं, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई – राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (Shinde Faction) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Thackrey Faction) यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर दावा केला. त्यानंतर शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची? हा तिढा सुप्रीम कोर्टात प्रलंबीत असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आयोगाने गोठवलं आहे.

या सर्व घडामोडींवर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्राचाळ प्रकरणी सुनावणीसाठी संजय राऊत यांना कोर्टात आणण्यात आले होते. त्यावेळी राऊत यांच्या नातेवाईकांसह शिवसैनिकांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावेळी संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना पक्षाचे नवीन चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल आणि भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. आमच्यात शिवसेनेचं ‘स्पिरीट’ असल्याचे त्यांनी सांगितले. या आधीही जनसंघ, काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. यात काही नवीन नाही. नवीन चिन्हानंतर हे पक्षही मोठे झाले. आपणही मोठे होऊ असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. खरी शिवसेना कोणती आहे, हे लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे चिन्ह बदललं तरी लोक आपल्याशी जोडले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.