आता मगरीचे अश्रू ढाळून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका; उद्धव ठाकरेंवर शीतल म्हात्रेंचा निशाणा

मुंबई – केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ (Bow & Arrow) गोठवण्याचा निर्णय दिला व पक्षाचे नावही वापरण्यास बंदी घातल्यानंतर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. एका बाजूला हे सर्व सुरू असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी रविवारी संध्याकाळी फेसबुक लाईव्हद्वारे याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली. यादरम्यान ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

तर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी पाहिल्याचा दावा केला आहे.  उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक संकट आली. अनेक लोक तुटून पडले. पण आतापर्यंत ते खचले नव्हते. आज मी त्यांच्या डोळ्यात अश्रू बघितले, हे योग्य नसल्याची खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे.

यावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठण्यास खुद्द उद्धव ठाकरे जबाबदार असून आता मगरीचे अश्रू ढाळत सहानुभूती मिळवण्याचा कसलाही फायदा नाही, अशा शब्दांत शीतल म्हात्रे यांनी निशाणा साधला आहे.

आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटद्वारे ट्वीट करत त्यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला आहे. “निवडणूक आयोगाकडे अनेकवेळा तारखा शिल्लकसेनेने मागितल्या….वेळकाढूपणा केला… जरुरी कागदपत्रे वेळेवर दिली नाहीत… त्यामुळेच पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठले आणि आता मगरीचे अश्रू ढाळून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका…”, असे शीतल म्हात्रेंनी लिहिले आहे.