तिडाह जेलमध्ये आप नेते सत्येंद्र जैन यांना VVIP ट्रीटमेंट, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

दिल्ली: आम आदमी पार्टीचे नेते (आप) आणि कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांचा तिहाड तुरुंगातील (Tihar Jail) एक कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तिहाड तुरुंगात बेडवर आरामात झोपून सत्येंद्र जैन आपल्या पायांची मालिश करून घेताना दिसत आहेत. हा धक्कादायक प्रकार पुढे आल्यानंतर भाजपा आक्रमक झाली असून त्यांनी ‘आप’वर टीकेची झोड उठवली आहे. तुरुंगात असलेल्या सत्येंद्र जैन यांना अशा सोईसुविधा पुरवून आपने कारागृहातील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपाने लगावला आहे.

५८ वर्षीय सत्येंद्र जैन यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणी (Money Laundering) न्यायालयिन कोठडीत ठेवण्यात आले आहे. परंतु जेलमध्ये असताना सत्येंद्र जैन यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याने भाजपाने केजरीवाल सरकारवर निशाणा साधला आहे.

तिहाड जेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, पांढरा टी शर्ट घातलेला एक व्यक्ती सत्येंद्र जैन यांच्या पायांना मसाज करत आहे. यावेळी सत्येंद्र जैन मात्र आरामात बेडवर झोपून हातात काहीतरी कागदपत्रे पाहात आहेत. तसेच आणखी एका व्हिडिओत एक व्यक्ती सत्येंद्र जैन यांना बॉडी मसाज देताना दिसत आहे. याशिवाय त्यांना डोक्याची मालिशही करून दिली जात आहे.

आप सरकारचे नेते सत्येंद्र जैन यांना तुरुंगवासात असूनही अशी स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असल्याने भाजपाचे प्रवक्ता गौरव भाटिया यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भाटिया यांनी आपला स्पा आणि मसाज पार्टी म्हणत खोचक टोला लगावला आहे.

 

यावर स्पष्टीकरण देताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे की, सत्येंद्र जैन यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याने त्यांना फिजिओथेरपीचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु भाजपा त्यांच्या आजारपणाची खिल्ली उडवत आहे.