‘..तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता’, संजय राऊत यांनी गायले नेहरू यांचे गुणगाण

“स्वातंत्र्यवीर सावरकर आणि जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी अमुल्य योगदान दिलं. या दोघांचं कार्य मोठं आहे. पण या दोघांवर सध्या टीका होतेय. हे होता कामा नये. दोघांभोवतीचं राजकारण थांबायला पाहिजे”, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानानंतर राजकारण तापले आहे. यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली जात आहे. दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे होत असताना या वादावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीसाठी काम केलं. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा मोठा वाटा राहिलाय.त्यांनी कायम देशाच्या विकासाचा ध्यास घेतला. स्वातंत्र्यावीर सावरकर विज्ञाननिष्ठ होते. त्या दिशेला देशाला घेऊन जाण्याचं काम नेहरूंनी केलं. त्यांनी ते काम केलं नसतं तर या देशाचाही पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.