सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटींची रक्कम लाटली – संजय राऊत

मुंबई – शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED ) कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील (Alibaug ) आठ भूखंड आणि दादरच्या (Dadar) फ्लॅटचा समावेश आहे. एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जातंय.

पत्राचाळ घोटाळ्यातील (Patrachaul scam) पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटू लागले असून संपूर्ण महाविकास आघाडी आता राऊत यांचा बचाव करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला विरोधक आक्रमक झाले असून राऊत यांच्या अटकेची मागणी करत आहेत.

दरम्यान, आता संजय राऊत हे ज्यांच्यामुळे अडचणीत आले आहेत त्या माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांच्यावर राऊत यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती. या मोहीमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम किरीट सोमय्या यांनी लाटली. असा आरोप केला आहे.

हा पैसा त्यांनी २०१४ ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला. हा घोटाळा करून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी देशाच्या संरक्षणव्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा केली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.