‘काही लोकांनी पक्षाशी गद्दारी केल्यामुळे पीछेहाट झाली होती, मात्र आता स्वबळावर कॉंग्रेसचा झेंडा  फडकावणार’

मुंबई – भिवंडीच्या जनतेने कायमच काँग्रेस विचारांना साथ दिली असून भिवंडी काँग्रेसचा गड राहिला आहे पण काही लोकांनी पक्षाशी गद्दारी केल्यामुळे आपली पीछेहाट झाली होती. पण आता काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरु झाले असून भिवंडीला पुन्हा काँग्रेस गड बनवा आणि स्वबळावर काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

भिवंडी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या व समाजवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष जावेद अशफाक फारुखी, बलबीर सिंग वालिया, फैसल फारुखी, झईम बनारसी, समाजवादी पक्षाचे भिवंडीचे उपाध्यक्ष खालीद अन्सारी, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष वकार अन्सारी, कामगार सेलचे अध्यक्ष शोएब राजा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे डॉ. याह्या खातीमिती, इक्बाल शेख, शादाब मोमीन, डॉ. दिनेश वालिया, भारतीय विश्वकर्मा संघटनेच्या सविता ब्राम्हणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व भिवंडीचे प्रभारी मुनाफ हकीम, भिवंडी शहर काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर मोमीन, माजी महापौर जावेद दळवी, प्रदेश सरचिटणीस राणी अग्रवाल, प्रदेश सचिव मनोज शिंदे, संतोष केणे, पप्पू रांका यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करून नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. केंद्रातील सरकारने जनतेची फसवणूक केली असून मोदी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे छोटे उद्योग बंद झाले आहेत. शेतकरी अडचणीत आहेत. महागाई, बेरोजगारीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. काँग्रेस शिवाय पर्याय नाही हे आता लोकांच्या लक्षात आले आहे त्यामुळे विविध पक्षातून काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरु झाले आहे. नगरपंचायत निवडणुकीत स्वबळावर काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. भिवंडीतील इतर पक्षातील अनेक नेते आपल्या संपर्कात असून तेही लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. भिवंडीचे खासदार, दोन्ही आमदार काँग्रेसचे असतील आणि महापालिकेत स्वबळावर काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी गट तट सोडून एकत्रितपणे कामाला लागा असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.