बोले तैसा चाले :  एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; शिवसैनिक सुमंत रुईकरांच्या घराचे केले भूमिपूजन

बीड – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी पायी तिरुपती येथे जाणाऱ्या सुमंत रुईकर या शिवसैनिकाचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबाचं पालकत्व स्वीकारलं होतं. एकनाथ शिंदे यांनी या शिवसैनिकाच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं.

एकनाथ शिंदे यांनी आपण दिलेला शब्द पाळला असून सुमंत रुईकर यांच्या घराचं भूमीपूजन करण्यात आलं.विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रुईकर यांच्या घराचे भूमीपूजन करण्यात आलंय. या भूमीपूजनाला मंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात.

दरम्यान, यापुढील पूर्ण जबाबदारी मंत्री शिंदे यांचे प्रतिनिधी बाजीराव चव्हाण यांच्यावर देण्यात आलीय. दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. दुसरीकडे रुईकर कुटुंब शिवसेनेकडून करण्यात आलेल्या मदतीमुळे भावूक झाले होते.