सरकारला अखेर आली जाग; राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

मुंबई  : महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.

हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे सुपे यांचे मुख्यालय राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना सुपे यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवतणुकीबाबत दोषी ठरतील आणि कारवाईस पात्र ठरतील, असेही याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

सन २०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना दि. १६ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे. सुपे यांना अटक केल्याच्या दिनांकापासून ४८ तासापेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये सुपे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.