Sunil Tatkare | ‘आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही

Sunil Tatkare | राजकीय संक्रमण काळात ‘आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोहा येथील आभार सभेत दिला.

रोहेकरांचे ऋण व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. समर्पित भावनेने या भागासाठी त्याग केला आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून ज्यापध्दतीने झपाटल्यासारखे काम केले त्यामुळे रोहेकरांनी मताधिक्य दिले त्यामुळे आयुष्य असेपर्यंत हे ऋण मी कधी विसरु शकत नाही अशा शब्दात सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या तालुक्याने माझ्या पाठीमागे मोठी शक्ती उभी केली आहे. निवडणूकीत परस्परांच्या विरोधात राजकीय लढाई लढत असताना पूर्वग्रहदूषित काही काम माझ्या हातून घडले नाही हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.

देशात ज्या काही कमी जागा आल्या त्याला कारण संविधान बदलाबाबत होणारा अपप्रचार होता. अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली. निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु ज्यावेळी जातीचे राजकारण पवारसाहेबांच्या उपस्थित इथे झाले याचे मनस्वी दु:ख झाले. गेली ४० वर्ष राजकारणात कार्यरत असताना सर्वधर्मसमभाव विचार घेऊन काम करताना कुठेही कुठल्या समाजाला दुरावा निर्माण करण्याचे काम झाले नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

या निवडणुकीत शेकाप हा किंगमेकर आहे असे चित्र निर्माण करण्यात आले होते. एक्झिट पोलमध्येही आम्ही मागे आहे असे दाखवण्यात आले मात्र रोहेकर आणि जिल्हयातील जनतेने हे किंगमेकर नाहीत हे मला विजयी करुन दाखवून दिले असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

या रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या सहाच्या सहा जागा निवडून आणायच्या आहेत आणि त्या स्पष्टपणे मिळवू असा आत्मविश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

पत्नीचा उल्लेख करणे आज आवश्यक आहे कारण ती यावेळी जी काही माझ्यासाठी फिरली… मी तिला माऊली घरात आमच्यासाठी करते आणि इकडे पण का? मात्र तिने तिची जिद्द सोडली नाही आणि ती फिरली.. तिचे कौतुक करावे तितके कमीच आहे असेही आवर्जून सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी सांगितले.

५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अदानी समूहासोबत चर्चा करुन १५ दिवसात काम सुरू होईल आणि वर्षभरात कार्यान्वित होईल आणि दुसरं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलही सुरू करण्याचा माझा मानस आहे असा पक्का शब्द सुनिल तटकरे यांनी रोहेकरांना दिला.

सर्वात उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा रोहयात उभा राहणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकही पूर्ण होणार आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली.

४० वर्ष जी काही अविरत मेहनत घेतली त्याचे फळ रायगड जिल्ह्याने मला अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. इथल्या सुजाण आणि सुज्ञ नागरिकांनी मला साथ दिली आहे त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले.

या मतदारसंघात जातीपातीचे राजकारण सुरू असताना विकासाच्या मुद्यावर इथल्या जनतेने निवडणूक ताब्यात घेत हक्काचा प्रतिनिधी निवडून दिला आहे. राज्य सरकारचे सहकार्य मिळणार आहेच शिवाय केंद्राचेही आपला खासदार असल्याने निर्विवाद सहकार्य मिळणार आहे असा विश्वास बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी रोहेकरांना दिला.

तटकरेसाहेब हे आपल्या घरातलीच व्यक्ती समजून तुम्ही मतदारसंघात उतरलात आणि आपण घेतलेल्या परिश्रमाला जनतेने प्रतिसाद चांगला दिला. महायुतीचा खासदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले त्याबद्दल अदितीताई तटकरे यांनी श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेचे आभार मानले.

रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आभार दौरा दिनांक १४ जूनपासून सुरू केला असून दुसर्‍या दिवशी रोहा येथे महायुतीच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अनिकेत तटकरे यांनी केले.

या आभार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष अमित घाग, नितीन तेंडुलकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, कुणबी समाज नेते सुनिल मगर, कुणबी समाजाचे अध्यक्ष रामचंद्र सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, नेत्या दिपिका चिपळूणकर आणि महायुतीचे नेते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप