आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी; मुस्लीम समाजाने घेतलेल्या निर्णयाचं सर्वत्र होतंय कौतुक

यंदा आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आणि मुस्लीम समुदायाचा पवित्र सण बकरी ईद (Bakri Eid) एकाच दिवशी आले आहेत. २९ जून रोजी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आहेत. याच पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजाचे मोठा निर्णय घेतला आहे, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील पंढरपूर गावचे माजी सरपंच शेख अख्तर यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला सांगितलं की, “२९ तारखेला आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. त्याच दिवशी मुस्लीम बांधवांची बकरी ईद आहे. त्यामुळे आमच्या गावातील सर्व मौलाना आणि जुम्मेदार लोकांनी असा निर्णय घेतला आहे की, बकरी ईदची कुर्बानी ३० जून रोजी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाईल.

“आमच्या गावात आषाढी वारीला १२ ते १५ लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मुस्लीम समुदायाला विनंती करतो की, बंधुभावाचा संदेश सर्वत्र पोहोचवा आणि आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी करा. बकरी ईद साजरी करण्यासाठी आपल्याला तीन दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे आपण २९ ऐवजी ३० तारखेला बकरी ईद साजरी करावी, अशी विनंती मी संपूर्ण मुस्लीम समुदायाला करतो. आमच्या गावात आम्ही २९ तारखेला कसलीही कुर्बानी देणार नाही. दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाईल,” असंही शेख अख्तर म्हणाले.

मुस्लीम समुदायाच्या या निर्णयाने पुन्हा एकदा हिंदू-मुस्लीम एकतेचं उदाहरण घालून दिलं आहे.