राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक, हा कोणता न्याय? : संभाजी राजे

पुणे : स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात राज्यपालांचा निषेध करण्यात आला. ‘राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला. यानंतर पोलिसांनी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

यावरून संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chatrapati) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक आणि शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा, हा कोणता न्याय?, असा सवालही त्यांनी ट्वीटरवरून उपस्थित केला आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी एका कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये आलेले आहेत. पाषाण येथे असलेल्या अभिमान श्री सोसायटी जवळ संभाजीराजे छत्रपती यांच्या संघटनेकडून काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त कार्यकर्त्यांनी राज्यपालांचा जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला. यानंतर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा! हा कोणता न्याय? आमच्या दैवतांचा, महापुरुषांचा अवमान करून कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संविधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलिस कारवाई करतात. हा कुठला न्याय आहे?, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.