मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा थेट जनतेतूनच निवडावा; अमोल मिटकरी यांची मागणी

Mumbai – राज्यातील ग्रामपंचायतीमधील निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम -1958 च्या कलमांमध्ये सुधारणा करण्याच निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सध्या ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याची पद्धत आहे. मात्र लोकांमधून सरपंच निवडल्यास ग्रामपंचायतींचे काम अधिक परिणामकारक होईल, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय विशेष ग्रामसभेसमोर शिरगणतीद्वारे साध्या बहुमताने सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव घेता येईल. मात्र सरपंच किंवा उपसरपंचांच्या निवडणुकीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या कालावधीत आणि पंचायतीची मुदत समाप्त होण्याच्या सहा महिन्यांच्या आत असा कोणताही अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही.

दरम्यान, नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडण्याच्या घोषणेनंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा जनतेतून निवडला गेला पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा जनतेतून निवडावा अशी मागणी केली आहे. ही मागणी करताना अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.