पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक; जाणून घ्या नेमक्या कोणत्या प्रकरणात झाली कारवाई

पटियाला – पंजाबी गायक दलेर मेहंदीला पोलिसांनी अटक केली (Punjabi singer Daler Mehndi has been arrested by the police) आहे. 2003 साली नोंदवलेल्या मानवी तस्करी (Human Trafficking) प्रकरणात दलेर मेहंदीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. याच शिक्षेला त्यांनी पटियाला सत्र न्यायालयात आव्हान दिले, मात्र न्यायालयाने दलेर मेहंदीची शिक्षा कायम ठेवल्यानंतर पोलिसांनी लोकप्रिय गायकाला अटक केली. गायक दलेर मेहंदीला पोलिसांनी अटक केली असून प्रथम वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवले जाऊ शकते.

2003 मध्ये दाखल झालेल्या कबुतरखाना प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान पटियाला सत्र न्यायालयाने दलेर मेहंदीची शिक्षा कायम ठेवली. गायक दलेर मेहंदीला पंजाबमधील पतियाळा न्यायालयाने मानवी तस्करी प्रकरणात दोषी ठरवले आहे. दलेर मेहंदीवर लोकांना अवैधरित्या परदेशात नेल्याचा आरोप आहे. जेव्हा हे प्रकरण न्यायालयात पोहोचले तेव्हा हे आरोप खरे असल्याचे आढळून आले आणि या प्रकरणात 15 वर्षांनंतर म्हणजेच 2018 मध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, न्यायालयानेही त्यांना तात्काळ जामीन मंजूर केला होता.

2003 मध्ये सदर पटियाला पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर (FIR) केल्यानंतर मेहंदीला भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 406, 420, 120B, 465, 468, 471 आणि भारतीय पासपोर्ट कायद्यानुसार दोषी ठरवण्यात आले होते. परदेशात पाठवण्याच्या बहाण्याने लोकांकडून एक कोटी रुपये उकळल्याप्रकरणी दलेर आणि इतरांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

वृत्तानुसार, 1998-99 या वर्षात दलेर आणि त्याचा भाऊ शमशेर सिंह (Shamsher Singh) यांनी 10 लोकांना अवैधरित्या परदेशात पाठवले होते. या प्रकरणी 2003 साली बख्शीश सिंह (Bakshish Singh) नावाच्या व्यक्तीने दलेर मेहंदीविरोधात तक्रार दाखल केली होती. तथापि, अटकेनंतर दलेर मेहंदीला पटियाला सेंट्रल जेलमध्ये पाठवले जाऊ शकते, जिथे नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) रोड रेज प्रकरणी आधीच एक वर्षाची सश्रम कारावास भोगत आहे