राजकीय, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात गडाख कुटुंबीय घट्ट पाय रोवून उभे – छगन भुजबळ

मुंबई – राजकीय, सामाजिक आणि साहित्य जिवनात गडाख कुटंबीय आपले पाय घट्ट रोवुन उभे आहेत. कुठलाही राजकीय वारसा नसतानाही विलक्षण जिद्द, जनसंग्रहाचा व्यासंग यातून माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी ग्रामीण भागाचा कायापालट तर केलाच पण आपल्या लेखनातुन साहित्य विश्वात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अश्या भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. यशवंतराव गडाख यांच्या मनातला पाऊस या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत पार पडले यावेळी ते बोलत होते.

यशवंतराव गडाख यांनी नगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच साहित्य क्षेत्रात अतुलनीय काम केले. त्यांच्या कष्टाने सोनईसह परिसराचे सोने झाले असे मत व्यक्त करतानाच सोनई सारख्या छोट्या गावात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे बालपण गेले. त्यामुळेच त्यांना शेतकरी, कष्टकरी माणसांचे, दलितांचे, शेतकऱ्यांचे जगणे कधी परके वाटलेच नाही.असे मत देखील त्यांनी व्यक्त केले

यावेळी ते म्हणाले की, भावनिक असलेल्या यशवंरावांनी समाजकारण, सहकार आणि राजकारण या क्षेत्रांमध्ये वावरताना साहित्यिकांबद्दलचा नितांत आदर राखला आणि साहित्याची अभिरुची जोपासताना साहित्यक्षेत्रात यशस्वी मुशाफिरी केली आहे. त्यांच्या अर्धविराम आत्मचरित्र, अंर्तवेध, सहवास, माझे संचित या पुस्तकांमधुन एकप्रकारे जगण्याचा प्रवासच उलगडला आहे.

यावेळी साहित्य संमेलन घेणे सहज शक्य होत नाही हे सांगतानाच 1997 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात आयोजित केलेल्या  70 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच उल्लेख देखील मंत्री छगन भुजबळ यांनी केला. गिरीश कर्नाड, गुलजार, बासू भटटा्चार्य, डॉ. श्रीराम लागू, आचार्य किशोर व्यास, पं.हृद्यनाथ मंगेशकर, शांता शेळके, व्यंकटेश माडगूळकर, विंदा करंदीकर, ना.सं.इनामदार, गंगाधर गाडगीळ,वसंत बापट,विजया राजाध्यक्ष, नारायण सुर्वे, यू.म.पठाण, आनंद यादव, द.मा.मिरासदार, ना.धों.महानोर, सुभाष भेंडे, शिवाजी सावंत, माधव गडकरी, अशा नामवंतांनी हजेरी लावली होती अशी आठवण देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. फक्त राजकीय आणि समजिक क्षेत्रच नाही तर साहित्य क्षेत्रातही सहज वावरणाऱ्या यशवंतराव यांचा नेहमी आदरच वाटतो अश्या भावना देखील मंत्री भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केल्या.