अभिनेत्री केतकी चितळेकडून रावणाचा ‘श्री रावण’ असा उल्लेख; नव्या वादाला तोंड फोडलं!

आदिपुरुष (Adipurush) हा बहुप्रतिक्षित चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आदिपुरुष रिलीज झाल्यानंतर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील डायलॉग्सवरुन दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अगदी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही काहींनी केली आहे. अशातच आता अभिनेत्री केतकी चितळे Ketaki Chitale) हिने रावणाचा श्री रावण असा उल्लेख करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये केतकी चितळेने लिहीलं की, “बऱ्याच लोकांनी मला विचारले की माझे आदिपुरुष या सिनेमा विषयी काय मत आहे. माझे मत: मी बघितलेला नाही त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. पण ज्या चित्रपटाच्या टिझर मध्ये शिवभक्त रावण रुद्राक्ष तोडणार असेल तर मी तो चित्रपट बघणारही नाही.”

“रावण एक शिवभक्त ब्राह्मण होते ज्यांनी सौराष्ट्रातील सोमनाथ मंदीर बांधले होते. सोमनाथ मंदीर अनेक वेळा पडले आहे आणि बऱ्याच राजांनी आणि एका राणीने ते पुन्हा बांधले आहे. त्यापैकी एक श्री रावणही आहेत. रामायण हा घडलेला इतिहास आहे, फिरंगांनी ठरवलेले मिथ्य नाही. पुरावे आहेत रामायणाचे. नवी पिढी मूर्ख नाही की जे त्यांच्या नावावर बिल फाडून सारवासारव करणे चालू शकेल.” दरम्यान केतकीच्या या पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.